इंद्र जिमि जृंभपर ! बाडव सुअंभपर ! रावण सदंभपर ! रघुकुल राज है … !
पौन वारिवाह पर ! संभु रतिनाह पर ! ज्यो सहसवाह पर !राम द्विज राज है … !
दावा दृमदंड पर ! चिता मृगझुंड पर ! भूषण वितुंड पर ! जैसे मृगराज है … !
तेज तमंअंस पर ! कन्न्ह जिमि कंस पर ! त्यों म्लेंच्छ बंस पर ! शेर शिवराज है … !
शेर शिवराज है … शेर शिवराज है … शेर शिवराज है … शेर शिवराज है … !
… कवीराज भूषण.
भाषांतर :
जृंभासुरास जसा इंद्र, समुद्रास वडवानल, (१) गर्विष्ठ रावणास रामचंद्र, (२) मेघास वायु, मदनास शिव, (३) सहस्त्रार्जुनास परशूराम, (४) वृक्षास दावाग्नी, हरिण कळपावर चित्ता , (५) हत्तिस सिंह , (६), अंध:कारास प्रकाष, कंसास श्रीकृष्ण ,(७) त्याप्रमाणे म्लेंच्छकुळावर सिंहासमान शूर शिवराज होय.
______________________________________________________________
सक्र जिमि सैल पर । अर्क तम-फैल पर । बिघन की रैल पर । लंबोदर देखीये … !
राम दसकंध पर । भीम जरासंध पर । भूषण ज्यो सिंधु पर । कुंभज विसेखिये … !
हर ज्यो अनंग पर । गरुड ज्यो भूज़ंग पर । कौरवके अंग पर । पारथ ज्यो पेखिये … !
बाज ज्यो विहंग पर । सिंह ज्यो मतंग पर । म्लेंच्छ चतुरंग पर । सिवराज देखीये … !
सिवराज देखीये … सिवराज देखीये … सिवराज देखीये … सिवराज देखीये … !
… कवीराज भूषण.
भाषांतर :
ज्या प्रमाणे ईंद्र पर्वताचा, सुर्य अंध:काराचा व विग्नहर्ता गणराज विघ्नसमुदायाचा नाश करतो, (१)किंवा ज्या प्रमाणे रामाने रावणाचा व भीमाने जरासंधाचा नाश केला, अगस्त्ति ऋषींनी समुद्राचा घोट घेतला, (२)महादेवाने मदनास जाळून भस्म केले, अर्जुनाने कौरवांचा नि:पात केला, (३)किंवा सर्प गरुडास, पक्षी बहिरी ससाण्यास व हत्ती सिंहास बघुन भयभीत होतात, तद्वत इस्लामी चतुरंग सैन्य शिवरायांच्या पराक्रमासमोर भयभीत होते.
_________________________________________________________________
कुंद कहा, पयवृंद कहा, अरूचंद कहा सरजा जस आगे ?
भूषण भानु कृसानु कहाब खुमन प्रताप महीतल पागे ?
राम कहा, द्विजराम कहा, बलराम कहा रन मै अनुरागे ?
बाज कहा मृगराज कहा अतिसाहस मे सिवराजके आगे ?
… कवीराज भूषण.
भाषांतर :
कुंद, दुध व चंद्र यांची शुभ्रता शिवरायांच्या यशासमोर काय आहे ? (१), पृथ्वीवर पसरलेल्या शिवरायांच्या प्रखर प्रतापापुढे सुर्य व अग्नी यांच्या तेजाचा काय पाड ? (२), समरप्रियतेमध्ये दाशरथी राम, परशूराम व बलराम हे देखिल शिवरायांच्या मागेच होत.(३) आणि धाडस पाहिले असता बाज (बहिरी ससाणा – पक्ष्यांवर झेप घेणारा) व सिंह हे शिवरायांच्यापुढे तुच्छ होत.
______________________________________________________________
पैज प्रतिपाल भर भुमीको हमाल,चहु चक्कको अमाल भयो दंडक जहानको … !
साहीन की साल भयो, ज्वार को जवाल भयो,हर को कृपाल भयो, हर के विधानको … !
वीर रस ख्याल सिवराज भू-अपाल तेरो,हाथके बिसाल भयो भूषण बखानको … !
तेज तरवार भयो, दख्खनकी ढाल भयो,हिंदुकी दिवार भयो, काल तुरकानको … !
काल तुरकानको … काल तुरकानको … काल तुरकानको … काल तुरकानको … !
… कवीराज भूषण.
भाषांतर :
शिवराज भूपाल – प्रतिज्ञा पूर्णत्वास पोचवणारा, भूमीभार शिरावर घेणारा, चहूं दिशांच्या राज्यांवर अम्मल गाजवणारा, जगतास शासन करणारा, तसेच बादशहास शल्ल्याप्रमाणे जाचणारा, (प्रजेची) पीडा हरण करणारा आणि नरमुण्डमाला अर्पण करण्याच्या विधीने महादेवावरही कृपा करणारा असा झाला. भूषण म्हणतो तूझी तरवार दख्खनला ढालीप्रमाणे व हिंदूंना भिंतीप्रमाणे रक्षण करणारी झाली असून तुर्कांन्ना (ईस्लामला) मात्र प्रत्यक्ष काळ झाली आहे. वीररस प्रिय अशा शिवरायाच्या विशाल भुजांचे (ज्या स्वत: शक्ती संपन्न असून इतरांनाही शक्ती देणार्या आहेत) कोण वर्णन करू शकेल ?
_______________________________________________________________
जै जयंति जै आदि सकति जै कालि कपर्दिनी … ।
जै मधुकैटभ – छलनि देवि जै महिषविमर्दिनि … ।
जै चमुंड जै चंड मुंड भंडासूर खंडिनि … ।
जै सुरक्त जै रक्तबीज बिड्डाल – विहंडिनि … ।
जै जै निसुंभ सुंभद्दलनि भनि भूषन जै जै भननि … ।
सरजा समत्थ सिवराज कहॅं देहि बिजय जै जग-जननि … ।
… कवीराज भूषण.
भाषांतर :
हे आदिशक्ति ! हे कालिके ! हे कपर्दिनि (गौरी) ! हे मधुकैटभ महिषासूरमर्दिनि देवी ! हे चामुंड देवी ! हे भंडासूर्खंडिनी ! हे बिडाल विध्वंसिनी ! हे शुंभ-निशुंभ – निर्दालिनी देवी ! तुझा जयजयकार असो ! भूषण म्हणतो हे जगज्जननी ! सिंहासमान शूर अशा शिवरायास विजय देत जा.
________________________________________________________________
दच्छिन को दाबि करि बैठो है । सईस्तखान पूना मॉंहि दूना करि जोर करवार को ॥
हिन्दुवान खम्भ गढपति दलथम्भ । भनि भूषन भरैया कियो सुजस अपार को ॥
मनसबदार चौकीदारन गंजाय महलनमें ।मचाय महाभारत के भार को ॥
तो सो को सिवाजी जे हि दो सौ आदमी सों ।जीत्यो जंग सरदार सौ हजार असवार को ॥
… कवीराज भूषण.
भाषांतर :
शाइस्तेखान दक्षिण हस्तगत करून पुण्यात ठाणे देऊन बसला. या वेळी हिंदूंचा आधारस्तंभ व किल्लेदारांच्या एका सेनानायकाच्या तरवारीस जोर चढला अन् त्याने अपार सुकिर्ती मिळवली. (ती अशी मिळवली की)मोठमोठ्या मनसबदारास व चौकिदारास जखमी करून त्याने महालांत शिरून महाभारत माजवण्यास (युद्ध करण्यास) सुरुवात केली !भूषण म्हणतो, कि हे शिवराया, तुझ्या शिवाय दुसरा पराक्रमी कोण आहे ? ज्याने फक्त दोनशे माणसांनिशी लाख स्वार असणार्या सरदाराबरोबरचे युद्ध जिंकले.
_______________________________________________________________
प्रेतिनी पिसाच रु निसाचर निसाचरि हू, मिलि मिलि आपुसमे गावत बधाई है ।
भैरों भूत प्रेत भूरी भूधर भयंकर से, जुत्थ जुत्थ जोगिनी जमाती जुरि आई है ।
किलकि किलकि कै कुतूहल करति काली, डिमडिम डमरू दिगंबर बजाई हैं ।
सिवा पूंछै सिव सों “समाजु आजु कहॉ चली”, काहू पै सिवा नरेस भ्रकुटी चढाई है ॥
… कवीराज भूषण.
भाषांतर :
(या छंदात भूषण कवीने काल्पनिक शिव – पार्वती संवाद वर्णिलेला आहे)प्रेते, पिशाच्चे, राक्षस, राक्षसी जमून आपापसात आनंदाने गात आहेत. पर्वताप्रमाणे धिप्पाड शरीरे धारण करणारे भैरव, तसेच भूते, प्रेते यांच्या झुंडीच्या झुंडी जमू लागलेल्या आहेत, कालीदेवता किल किल शब्द करून जमलेल्या समाजाचे कौतुक करीत आहे, आणि महादेव आनंदाने डमरू वाजवत आहे. हा शिवगणाचा आनंद पाहून पार्वतीने महादेवास विचारले,“महाराजा, आज आपली मंडळी कुठे निघाली आहेत? “महादेव म्हणाले,“आज, शिवराज कोणा शत्रुवर कृद्ध झालेले आहेत.”
_______________________________________________________________
एक कहे कल्पद्रुम है, इमि पूरत है सबकी चितचाहे ।
एक कहे अवतार मनोज, की यो तनमे अति सुंदरता है ।
भुषण एक कहे महि इंदु यो, राजविराजत बाढयौ महा है ।
एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है ॥
… कविराज भुषण
भाषांतर :
यास कोणी कल्पवृक्ष म्हणतात, कारण हा सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.हा सौंदर्यसंपन्न असल्याने कोणी याला मदनाचा अवतार म्हणतात. भूषण याला पृथ्वीवरचा चंद्र म्हणतो, कारण याचे राज्य कलेकलेने वाढत आहे. कोणी याच्या युद्धातील पराक्रमामुळे यास सिंह म्हणतात तर कोणी प्रत्यक्ष नृसिंह भगवानच समजतात. कारण ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडले तद्वतच शिवरायांनी आपल्या वाघनखांनी अफजलखानाची आतडी बाहेर काढली.
देवल गिराविते, फिराविते निसान अली ।
ऐसे डूबे रावराने, सबी गए लबकी ।
गौर गणपती आप, औरनको देत ताप ।
आपनी ही बार सब, मारी गये दबकी ।
पीरा पैगंबर, दिगंबर दिखाई देत ।
सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रब की ।
कासी की कला गई, मथुरा मस्जिद भई ।
गर सिवाजी न होते तो, सुन्नत होती सबकी ॥
… कविराज भूषण
भाषांतर :
यवनांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला तेव्हा राव – राणे (राजे महाराजे) भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. इतके ते निर्बल व निस्तेज झाले. थोडेसे पुजा विधान चुकले तर भक्तांनाच ताप देणार्या देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून लपून बसण्याची वेळ आली. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून ‘रब’ची चर्चा सुरू झाली. जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. काशी कळाहीन झाली, मथुरेला मशीद उभी राहीली, अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर सर्व हिन्दुंची सुन्ता झाली असती.
________________________________________________________________
कुंभ कन्न असुर अवतारी अवरंगजेब कीन्ही ।
कत्ल मथुरा दोहाई फेरि रब की ।
खोदि डारे देवी देव सहर महल्ला बाँके ।
लाखन तुरूक कीन्हे छूटि गई तब की ।
भूषन भनत भाग्यो कासीपति विश्वनाथ ।
और कौन गिनती में भूली गति भब की ।
चारो वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि ।
सिवाजी न हो तो सुनति होत सब की ॥
… कविराज भूषण
भाषांतर :
भूषण म्हणतो, कुंभकर्ण राक्षसाचा अवतार जो औरंगजेब – त्याने मथुरेची कत्तल करून सर्व शहरात “रब”ची द्वाही फिरवली (मुसलमानी चालविली). शहरातील गल्लोगल्लीतून असलेल्या उत्तम उत्तम देवता खोदून खणून काढल्या. लाखो हिंदुंना बळाने मुसलमान केले, इतकेच काय, प्रत्यक्ष काशी विश्वनाथ भयभीत होउन पळाले, महादेवाची अशी त्रेधा उडाली तेथे इतरांची काय कथा ? अशा भयाण वेळी जर शिवराय नसते तर चारही वर्णांना आपापले धर्म सोडून नमाज पढावा लागला असता व सर्व हिंदुंची सुंता झाली असती.
________________________________________________________________
साहि तनै सरजा कि कीरती सों ।
चारों और चाँदनी वितान छिति छोर छाइयतु है ।
भूषन भनत ऐसो भूप भौंसिला है ।
जाको द्वार भिच्छुकन सो सदाई भाइयतु है ।
माहादानी सिवाजी खुमान या जहान ।
पर दान के प्रमान जाके यों गनाइयतु है ।
रजत की हौस किए हेम पाइयतु जासो ।
हयन की हौस किए हाथी पाइयतु है ॥
… कविराज भूषण
भाषांतर :
शहाजी पुत्र शिवरायांच्या कीर्तिरूप चांदणीचा मंडप पृथ्वीच्या चहूंकडील टोकापर्यंत पसरला आहे. भूषण म्हणतो, हे भोसलेराज असे आहेत की, भिक्षुकांना नेहमी त्यांच्या द्वाराशी पडून रहावेसे वाटते. या भूतलावर शिवाजी महाराज महान महान दाता असून त्यांच्या दानाचे प्रमाण यावरूनही समजून येते ; की रूप्याची इच्छा केली असता सोने मिळते व घोड्याची इच्छा केली असता महाराजांकडून हत्ती मिळतो.या छंदावरून शिवाजी महाराजांनी दानाप्रीत्यर्थ कविराज भूषणास हत्ती भेट दिलेला असावा असा तर्क करावयास जागा आहे.
_____________________________________________________________
साजि चतुरंग बीर रंग में तुरंग चढी ।
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं ।
भूषन भनत नाद बिहद नगारन कें ।
नदी नद मद गैबरन के रलत हैं ।
ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल ।
गजन की ठैल पैल सैल उसलत हैं ।
तारा सो तरनि धूरि धारा में लगत जिमि ।
थारा पर पारा पारावार यों हलत हैं ॥
… कविराज भूषण
भाषांतर :
{शिवराय सैन्यासह युद्धास निघाल्यावेळचा देखावा कवी भूषणांनी वर्णिलेला आहे}
सिंहासम शूर शिवराय चतुरंग सैन्य तयार करून विरोचित उत्साहाने घोड्यावर बसून युद्ध जिंकण्याकरीता निघालेले आहेत, नगार्याचा भयंकर ध्वनि होऊ लागलेला आहे, उन्मत्त हत्तींच्या गंडस्थलातून निघणारा मद नदी नाल्यांच्या प्रवाहात मिसळत आहे, सैन्याच्या खळबळीने देशभर गल्लोगल्लीत कोल्हाळ माजून राहिला आहे, हत्तिंच्या एकमेकांवर रेलण्यामूळे डोंगर उलथून पडतात की काय असे वाटत आहे. सैन्याच्या खळबळीने व हत्तींच्या परस्पर रेटारेटीने उडत असलेल्या धुळीने आकाश इतके भरून गेले आहे की एवढा मोठा प्रचंड सूर्य, पण एखाद्या लहानशा तार्याप्रमाणे दिसू लागलेला आहे. समुद्र तर ताटात धावणार्या पार्याप्रमाणे सारखा आंदोलन पावत आहे.
______________________________________________________________
मन कवी भूषन को सिव की भगति जीत्यो
सिव की भगति जीत्यो साधु जन सेवाने ।
साधु जन जीते या कठिन कलिकाल
कलिकाल महाबीर महाराज महिमेवाने ॥
जगत मै जीते महाबीर महाराजन
ते महाराज बावन हू पातसाह लेवाने ।
पातसाह बावनौ दिली के पातसाह
दिल्लीपति पातसाहै जीत्यो हिन्दुपति सेवाने ॥
… कविराज भूषण
भाषांतर :
कवी भूषणाच्या मनात शिवभक्तिने ,शिव भक्तिस साधूजनांच्या सेवेने, साधूजनास कलिकालाने,कलिकालास शूर आणि कीर्तिवान राजांनी आणि या शूर आणि कीर्तिवान राजास बावन्न बादशहास जिंकणार्या (औरंगजेबाने) आणि त्या बावन्न बादशहाच्या बादशहास म्हणजे दिल्ली पति औरंगजेबास “हिन्दू पति” शिवरायांनी जिंकले.
या छंदात कवि भूषणाने शिवाजी महाराजांना “हिन्दूपति” अशी उपमा दिलेली आहे. यावरूनच पुढील काळात मराठी साम्राज्याला हिंदुपतपातशाही म्हणण्याचा प्रघात पडलेला असावा.
____________________________________________________________
सुन्दरता गुरुता प्रभुता भनि भूषन होत है आदर जामै ।
सज्जनता औ दयालुता दीनता कोमलता झलकै परजामै ।
दान कृपानहु को करीबो करीबो अभै दीनन को बर जामै ।
साहन सो रन टेक विवेक इते गुन एक सिवा सरजामै ॥
… कविराज भूषण
भाषांतर :
भूषण म्हणतो सौंदर्य, गुरुत्व व प्रभुत्व हे गुण यांच्या ठिकाणी वसत असल्यामुळे आदरास पात्र झालेले आहेत; तसेच यांच्या ठिकाणी प्रजेविषयी सौजन्य, दयालुता, कोमलता दिसून येते; शत्रुंना तरवारीचेच दान व दीनांना अभय वर देण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य आहे. बादशहांशी पण लावून युद्ध करणे आणि कोणतेही कार्य विचारपूर्वक करणे हे इतके गुण एका सर्जा (सिंहासमान शूर अशा) शिवरायांच्या ठिकाणी आहेत.
____________________________________________________________
चारि चारिचौकी जहाँ चकत्ताकी चहूं और, साँज अरु भोर लगी रही जिय लेवा की ।
कँधे धरी कांवर, चल्यो जब चाँवसे, एकलिए एक जात जात चले देवा की ।
भेंस को उतारी डार्यो डम्बर निवारी डार्यो, धर्यों भेंस और जब चल्यो साथ मेवा की ।
पौन हो की पंछी हो कि गुटखान कि गौन हो, देखो कौन भाँति गयो करामात सेवा की ॥
… कविराज भूषण
भाषांतर :
चारी बाजूला या चुग़ताई वंशाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या प्राणघातक चौक्या दिवसरात्र लागलेल्या आहेत. कावड खांद्यावर घेऊन एक एक जण मोठ्या डौलाने, अत्यंत आरामात देवाकडे निघालेले आहेत. अशा वेळी त्यांनी (शिवाजी महाराजांनी ) आपला वेष उतरवला, अवडंबर (जे आजारपणाचे अवडंबर माजवलं होतं ते) टाळलं, वेष बदलला आणि मेवा मिठाईच्या त्या पेटार्याबरोबर ते निघाले आणि पळून गेले. शिवाजी महाराजांची ही करामत बघून ( आग्र्याचे ) लोक थक्क झाले. त्यांना कळेना की ते (शिवाजी महाराज ) वार्याच्या झुळकीसारखे गेले की पक्ष्यासारखे उडून गेले की गुटखा खाऊन एकदम गुप्त झाले. शिवरायांच्या या करामतीला काय म्हणावे हे कोणांस कळेनासे झाले !
____________________________________________________________-
छाय रही जितही तितही अतिहि छबि छीरधि रंग करारी ।
भूषन सुद्ध सुधान के सौधनि सोधति सी धरि ओप उज्जारी ।
योंतम तोमहि चाबिकै चंद चहूं दिसी चाँदनि चारू पसारी ।
ज्यों अफजल्लहि मारि महीपर, कीरति श्री सिवराज बगारी ॥
… कविराज भूषण
भाषांतर :
ज्या प्रमाणे क्षीर समुद्रात जिकडे दृष्टी फेकावी तिकडे शुभ्रच शुभ्र छबि पसरलेली दिसते किंवा चंद्राने अंधकारास ग्रासून शुभ्र चांदणे पसरावे व त्या प्रकाशात शुभ्र चुने गच्ची प्रासादांची जशी सुंदर शोभा दिसावी त्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी अफजलखानास मारून पृथ्वीवर आपली उज्वल कीर्ति पसरवली.
________________________________________________________________
चढत तुरंग चतुरंग साजि सिवराज ।
चढत प्रतापदिन दिन अति अंग मै ॥
भूषन चढत मरहट्टन के चित्त चाव ।
खग्ग खुलि चढत है अरिन के अंग मै ॥
भोसिलाके हाथ गढ कोट है चढत अरि ।
जोट है चढत एक मेरू गिरिसृंग मै ॥
तुरकान गन व्योमयान है चढत बिनु ।
मान है चढत बदरंग अवरंग मै ॥
… कविराज भूषण
भाषांतर :
चतुरंग सैन्य सज्ज करून शिवराज घोड्यावर स्वार होतांच त्यांचा प्रताप दिवसेंदिवस (समरांगणात) वाढतो आहे. भूषण म्हणतो, (इकडे) मराठ्यांच्या मनात उत्साह वाढू लागतो, (तो तिकडे) उपसलेल्या तरवारी शत्रूच्या छातीत घुसत आहेत. भोसल्यांच्या हाती (एका मागून एक) किल्ले येऊ लागले (वाढू लागले) तर तिकडे शत्रूंच्या टोळ्या एकत्र होऊन मेरूपर्वताच्या शिखरावर चढू लागल्या. तुर्कांचे समुदाय (युद्धात मरण मिळाल्यामुळे) विमानात बसून आकाशमार्गे जात आहेत (तो इकडे) अवमान झाल्यामुळे अवरंगजेब निस्तेज होत आहे.
_________________________________________________________________
किबले की ठौर बाप बादसाह साहजहाँ,
ताको कैद कियो मानो मक्के आगि लाई है ।
बडो भाई दारा वाको पकरि कै कैद कियो,
मेहरहू नाहि माँ को जायो सगो भाई है ।
बडो भाई दारा वाको पकरि कै कैद कियो,
मेहरहू नाहि माँ को जायो सगो भाई है ।
बंधु तो मुरादबक्स बादि चूक करिबे को,
बीच ले कुरान खुदा की कसम खाई है ।
भूषन सुकवि कहै सुनो नवरंगजेब,
एते काम कीन्हे तेऊ पातसाही पाई है ॥
… कविराज भूषण
भाषांतर :
भूषण म्हणतो :- औरंगजेब ! ऐक. तू तुझ्या तीर्थासमान पूज्य असलेल्या आपल्या बापास शहाजनास कैद केले, हे तुमचे कृत्य परमपवित्र अशा मक्केस आग लावण्याइतकेच अनुचित आहे. एकाच आईच्या पोटी जन्मलेला, त्यातून वडिल बंधू जो दारा, त्यालाही पकडून कैदेत घातले. (यावरून मला वाटते) तुझ्या अंतःकरणात दयेचा लवलेश नाही; दुसरा भाऊ मुरादबक्ष याशी कपटाचरण न केल्याबद्दल कुराण घेऊन खुदाची खोटीच शप्पत घेतली. अशी ही कृत्ये केली म्हणून तर तुला बादशाही (राज्य) मिळाली आहे.
_________________________________________________________________
हात तसबीह लिए प्रात उठै बंदगी को,
आपही कपट रूप कपटसु जपके ।
आगरे में जाय दारा चौक में चुनाय लीन्हो,
छत्रहूँ छिनायो मानो मरे बूढे बाप के ।
कीन्हो है सगोत घात सो मै नाही कहौ फेरि,
पील पै तोरायो चार चुगुल के गप के ।
भूषन भनत छर छन्दी मतिमंद महा,
सौ सौ चूहे खाय के बिलारी बैठी तप के ॥
… कविराज भूषण
भाषांतर :
भूषण म्हणतो, हे औरंगजेब ! तुम्ही रोज सकाळीच उठून हातात स्मरणी घेउन ईश्वर प्राथना करता, पण हे सर्व ढोंग आहे, तुम्ही प्रत्यक्ष कपट रूपच आहात. कारण आग्र्यास जाउन आपल्या सख्या भावास – दारास तुम्ही चौकात जिवंत चिणले; जिवंत व वृद्ध बापास मृत समजुन त्याचे राजछत्र हिसकावून घेतले (व स्वतः राज्य करू लागला) ; मी आता अधिक सांगत नाही. आपल्याच गोत्रजांना चहाडखोर दुतांच्या नुसत्या चहाडयांवरुन हत्तीच्या पायाखाली तुडवून मारविले. तुम्ही मोठे धूर्त आहात ; धर्म शील आहोत असे दाखवता पण तुमच हे कपट शेकडो उंदीर खाऊन तपश्चर्या करणार्या मांजरा सारखेच आहे.
“वरील दोन छंदात कवीने औरंगजेबाचा ढोंगी स्वभाव व त्याची भयंकर कृत्ये वर्णन केलेली आहेत. भूषणाने जे छंद औरंगजेबाचे अभय घेऊन मग त्यास ऐकविले अशी आख्यायिका आहे.”
______________________________________________________________
